चपळूण : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनानंतर महायुतीच्या सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना वगळले जाईल अशा चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या संदर्भात विधान करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची उचलबांगडी होणार असल्याची टीका केली होती. यावर खुद्द योगेश कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांनी ‘सामना’ वाचायचं सोडून दिलं आहे. इतकंच नाही तर ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिकही आता ‘सामना’ घेत नाहीत. ‘सामना’ जर का हे सरकार चालवायला लागलं, तर मग कठीण होऊन जाईल. अशा बातम्यांना आम्ही महत्त्व देत नाही, अशी उपहासात्मक टीका त्यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २६ जुलै रोजी खेड दौ-यावर येत आहेत. अशातच शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम मतदारसंघात ठेवण्यात आले आहेत. या सगळ्याला योगेश कदम व त्यांच्या पत्नी श्रेया कदम उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करणार असल्याने त्याची तयारी सध्या योगेश कदम यांच्याकडून सुरू आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सावली डान्स बारबाबत केलेल्या आरोपांच्या प्रश्नावर विचारले असता योगेश कदम म्हणाले की, याबद्दल मी आधीही बोललो आहे, याबाबत मुख्यमंत्री महोदय योग्य निर्णय घेतील. अनिल परब यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर, ‘योग्यवेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ’ असे एका वाक्यात उत्तर देत त्यांनी विषय संपवला.
















