मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या १७ पैकी १२ जागांवर हक्क सांगताना भाजपने ठाणे व पुण्याची जागा मागितल्याने महायुतीला तणाव वाढला असून कोणतीही तडजोड करण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम नकार दिला आहे. शिंदेसेनेसोबतच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आग्रही भूमिका घेतल्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि पुणे या चार मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्वत: या दोन्ही मित्र पक्षांशी चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. आम्ही तीघे एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडूण देण्यासाठी होणा-या निवडणूकीसाठी अर्ज भरण्यास सोमवारपासून (२५ मे) सुरुवात झाली. मात्र, महायुतीमध्ये अद्याप जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. महायुतीमध्ये सुरुवातीला ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी २ जागा लढणार असल्याची चर्चा होती. पण शिंदे सेनेने ७ जागांची मागणी केली तर दुुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे मतदारसंघावरून आग्रही भूमिका घेतली आहे. यामध्ये काही जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमिवर शनिवारी भाजपचे नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी शिवसेनेचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथे भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जागावाटपावर कोणताही तोडगा न निघाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या रखडलेल्या जागावाटपासंदर्भात भाष्य केले. जागावाटपाबाबत आमच्या मित्र पक्षांशी चर्चा सुरु आहे. शिवसेनेशी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, तर राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या विधानपरिषदेच्या जागेबाबत चर्चा केली जात आहे. अजून मार्ग निघालेला नाही. मात्र, आम्ही तिघेही एकत्र बसून मार्ग काढू. या चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल असा मला विश्वास आहे असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आंबेनळीची दुर्घटना दुर्देवी
आंबेनळी घाटातील दरीत गाडी कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी आहे. तीन मृतदेह सापडले आहेत. अजून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. यासंबंधी पहिल्यांदा कुणालाही माहिती नव्हती. पण, हे बेपत्ता आहेत, लक्षात आल्यानंतर शोध घेण्यास सुरूवात केली. पुढील कारवाई चालू आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुढची नीट परीक्षा योग्य पद्धतीने होणार
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे नैराशातून आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, ज्या लोकांनी नीट पेपरमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड अन्याय केला आहे. आता केंद्र सरकार आणि तपास यंत्रणेने याची पाळेमुळे खणून काढत अटक करण्यात आली आहेत. पुढील नीटची परीक्षा अतिशय योग्य पद्धतीने होईल. कुणालाही गडबड करता येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.
हिंसा करणा-यांवर होणार कारवाई
इंधन तुटवड्यावरून राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर विरोधकांच्या टिकेकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सध्या जागतिक संकट आहे. जगात अनेक देशांनी पेट्रोल-डिझेलची आणीबाणी घोषित केली आहे. काही ठिकाणी दोनदोन दिवस लॉकडाऊन आहे. तरीही पेट्रोल-डिझेल देण्याचा प्रयत्न करतो आहे. काही ठिकाणी लोक जमा झाल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी हिंसक प्रवृत्ती दिसत आहे. त्यामुळे विनाकारण हिंसा करणा-यांवर कारवाई केली पाहिजे, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
















