33.4 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeसंपादकीयदिल्ली हादरली

दिल्ली हादरली

देशाची राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्र. १ जवळ सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये जोरदार बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामुळे दिल्ली हादरली असून स्फोटानंतर लागलेल्या आगीत बाजूच्या तीन कार जळून खाक झाल्या. या स्फोटात १३ जण ठार तर ३० हून अधिक जखमी झाले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बॉम्बस्फोटानंतर नवी दिल्लीसहित आर्थिक राजधानी मुंबई तसेच उत्तर प्रदेश आणि देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून स्फोटामध्ये ‘आयईडी’चा वापर करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या संयुक्त कारवाईतून दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळल्याचा दावा करण्यात येत असताना सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याचा परिसर स्फोटाने हादरला. हा दहशतवादी हल्ला होता की नाही, याबाबत तपास यंत्रणांनी निश्चित तपशील दिला नाही. हा हल्ला नियोजित कट असून दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमींची चौकशी करण्यासाठी ते रुग्णालयात पोहोचले. घटना गंभीर असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्य पोलिसांनी नुकतीच १५ दिवस संयुक्तपणे कारवाई करून सुमारे २९०० किलो स्फोटके जप्त केली तसेच तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक केली. या अटकेमुळे दहशतवादी संघटनांचा मोठा डाव उधळून लावल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी केला असतानाच नवी दिल्लीत लाल किल्ला परिसर बॉम्बस्फोटाने हादरावा हा योगायोग म्हणावा काय? सोमवारी संध्याकाळी ६.५५च्या सुमारास फोर्ट मेट्रो स्टेशनच्या गेट क्र. १च्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ुंदाई आय-२० कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, स्फोट झालेल्या कारचा फक्त सांगाडाच उरला.

स्फोटात ठार झालेल्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याचे दिसून आले. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि १५ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. बॉम्ब स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्यानंतर सर्वत्र सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे गेट बंद करण्यात आले तसेच चांदनी चौक मार्केट बंद करण्यात आले. एनएसजी, एनआयएचे पथक यांनीही तपास सुरू केला. जवळपासचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत. दिल्लीतील लाल किल्ला हा संवेदनशील परिसर असून या भागात पर्यटकांची वर्दळ असते. तसेच दिल्लीतील बाजारपेठाही याच भागात आहेत. गत दशकभरात लाल किल्ला परिसरात अनेक लहान-मोठे स्फोट झाले आहेत. गत चार दिवसांत दिल्लीत काही संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

त्यामुळे दिल्लीत झालेल्या या स्फोटाकडे दहशतवादी कृत्य म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबाद येथे २९०० किलो अमोनियम नायट्रेटचा साठा सोमवारीच जप्त करण्यात आला होता. याद्वारे ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गझवात-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनांशी संबंधित ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश करण्यात तपास यंत्रणांना यश आले होते. यात काही विद्यार्थी आणि व्यावसायिक दहशतवाद्यांशी संबंधित होते. दहशतवादी हाफिज सईद भारताविरुद्ध नव्या हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सईद या हल्ल्यासाठी बांगलादेशला लाँच पॅड म्हणून वापरणार असल्याचे वृत्त होते. ३० ऑक्टोबरला पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथील एका रॅलीत हे उघड झाले होते. हाफिज सईद निष्क्रिय बसून नाही. तो बांगलादेश मार्गे भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे असे वक्तव्य लष्कर-ए तोयबाचा वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह सैफने केले होते. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आधीच बांगलादेशात सक्रिय आहेत आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा बदला घेण्यासाठी सज्ज आहेत असेही तो म्हणाला होता.

यावरून लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट सुनियोजित होता असे दिसते. दिल्लीतील स्फोटामागे चार डॉक्टरांचा हात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तीन डॉक्टरांना अटक केली आहे तर चौथा फरार आहे. कार बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टर मोहम्मद उमर हा फरिदाबाद दहशतवादी मॉड्युलमधील फरार आरोपी असल्याचे सांगितले जाते. तो स्फोटात वापरलेली कार चालवत होता. अटकेच्या भीतीने त्याने घाईघाईने दोन साथीदारांसह स्फोट घडवण्याचे प्लॅनिंग केले आणि संध्याकाळी तो घडवून आणला असावा असा संशय आहे. उमरने स्फोटकांसोबत डिटोनेटर कारमध्ये ठेवल्याचा संशय आहे. स्फोटाचे ठिकाण आणि वेळ जास्तीत जास्त जीवित हानी व्हावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नॅरेटिव्ह तयार करावे यासाठी निवडण्यात आली होती. हल्ल्यात वापरलेली कार घटनेच्या तीन तास आधी जवळच्या मशिदीजवळ उभी होती. डॉ. मुझम्मिल शकीलच्या अटकेची बातमी कळताच डॉ. उमर घाबरला असावा आणि त्याने आत्मघाती हल्ला जलदरीत्या पूर्ण केला असावा. दिल्ली स्फोटात केवळ डॉक्टर उमर आणि डॉ. मुजम्मिल यांचेच नाव आहे असे नाही तर या दहशतवादी नेटवर्कमध्ये डॉ. शाहीन, डॉ. आदिल आणि डॉ. मोहिउद्दीन यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे.

पंतप्रधान मोदी भूतान दौ-यावर आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिल्लीतील स्फोटाचा उल्लेख केला. या स्फोटामागे षडयंत्र असून आमच्या तपास यंत्रणा या षडयंत्राच्या मुळापर्यंत जातील. षडयंत्र रचणा-यांना सोडले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर सा-यांच्या नजरा पुन्हा एकदा ‘ऑपरेशन सिंदूर’वर केंद्रित झाल्या आहेत. पहलगाम हत्याकांडाच्या प्रत्युत्तरात मे २०२५ मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी इशारा देताना म्हटले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’ फक्त थांबवण्यात आले आहे, संपलेले नाही. भविष्यात कोणतेही दहशतवादी हल्ले झाल्यास ते पुन्हा सुरू होईल. तपास यंत्रणा आता बॉम्बस्फोटाचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. जर हा स्फोट सीमेपलीकडून होणा-या कारवायांशी जोडला गेला असेल तर केंद्र सरकारची भूमिका कठोर कारवाईची असू शकते. दिल्ली स्फोटाचे पडसाद पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे तेथेही घबराट पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR