Homeसंपादकीयअद्भूत... अविश्वसनीय!

अद्भूत… अविश्वसनीय!

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ओसंडून वाहणा-या ‘लखपती’ महासागराच्या तोंडून अद्भूत… अविश्वसनीय असेच उद्गार ‘छलकले’ असतील! सूर्या सेनेने ९६ धावांनी ब्लॅक कॅप्सला खरपूस मार दिला. अनेक विक्रमांचे ‘जाम’ रिते झाले आणि नव्या विक्रमाचे पेग फेसाळले. टीम इंडियाला विजयाची नशा मिळावी म्हणून प्रार्थना, दुआ, होम-हवन, पूजा-अर्चा केल्या गेल्या. अखेर ‘अगर किसी चीज को दिलसे चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है’ हा एक हिंदी सिनेमातला डायलॉग भारतीय संघासाठी धाऊन आला, असे म्हणता येईल. भारतीय संघासाठी अहमदाबादचे स्टेडियम ‘पनोती’ आहे, शाप आहे या दंतकथाही सूर्याच्या संघाने खोट्या ठरवल्या. कारण या स्टेडियमवर दोन वेळा टीम इंडियाला पराभव चाखावा लागला होता.

तेव्हा आता ‘इजा-बिजा’नंतर ‘तिजा’ होतो की काय? अशी भीती क्रिकेट रसिकांना वाटत होती; परंतु कोच गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने योग्य नियोजन व जिद्दीच्या जोरावर विजय मिळवत ‘ती’ भीती दूर पिटाळताना क्रांती घडवली. जागतिक महिला दिनाचा आणि रंगपंचमीचा मुहूर्त साधत भारतीय संघाने विजयपंचमी साजरी केली आणि रविवारच्या मध्यरात्री दिवाळीतील उरले-सुरले आनंदाचे फटाके उडाले. रविवारी अंतिम सामना सुरू झाला तेव्हा देशातील प्रत्येक गरीब-श्रीमंताच्या हातातील मोबाईलवर सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. जिओ-हॉट स्टारवर सुमारे ७९ कोटी प्रेक्षक सामना पाहत होते. भारतातील हे क्रिकेटवेड अचंबित करणारे आहे. याची कल्पना वेड्या सँटनरला नसावी. कारण तसे नसते तर त्याने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले नसते.

त्याचे दुसरे एक कारण असे की, तुम्ही क्षेत्ररक्षण घेतले म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करणार आहात; परंतु लक्षावधी प्रेक्षकांच्या दबावरेट्याखाली धावांचा पाठलाग करणे कठीण असते. एक-दोन विकेट लवकर गेल्या की ते आणखी महाकठीण होऊन जाते. टॉसबाबत सूर्याची मजेशीर प्रतिक्रिया बघा- टॉस हरला आणि प्रतिपक्षाने फलंदाजी दिली की सूर्या म्हणतो, नाहीतरी आम्ही टॉस जिंकला असता तर प्रथम फलंदाजीच घेतली असती… म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी! भारतीय संघाची ‘रननिती’ अशी की फटक्यांचा धुमधडाका लावून दोनशेपार जायचे. या प्रवासात एक-दोन विकेट गेल्या तरी धावगती कमी होऊ द्यायची नाही. ‘पॉवर प्ले’चा भरपूर लाभ उठवायचा. उपउपांत्य, उपांत्य आणि अंतिम सामन्यात भारताची हीच रणनिती यशस्वी ठरली. संपूर्ण स्पर्धेत भारतीयांनी सांघिक खेळ केला. प्रत्येक सामन्यात विजयाचा शिल्पकार वेगळाच दिसायचा. संघातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेवल्याने संघाचे सांघिक यश उफाळून आले. आठव्या क्रमांकापर्यंत घणाघाती फलंदाज असल्याने दोनशेचा टप्पा सहज गाठता आला. प्रतिपक्षाचे गोलंदाज कायम दबावाखाली राहिले. स्पर्धेआधी अभिषेक शर्माने तुफान फटक्यांचा हिमालय उभा केला होता त्यामुळे स्पर्धेत त्याची बॅट धडाडणार असे वाटले होते.

प्रत्यक्षात त्याला तीन ‘भोपळे’ मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास ढेपाळला; परंतु संघ व्यवस्थापनाने त्याची काळजी घेतली, त्याला विश्वास दिला आणि कायम संधी देत राहिले. अंतिम सामन्यात त्याचे फळ मिळाले. पठ्ठ्याने १८ चेंडूतच स्पर्धेतील सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकले. पॉवर प्लेमध्येच ९२ धावांचा डोंगर उभा राहिला. येथेच किवीज् संघ गारद झाला. भारतीयांनी आपल्या डावात १९ चौकार आणि १८ षटकार चढवले. प्रत्येक फलंदाजाचा नेट स्ट्राइक रेट १३० च्या पुढे होता. शिवम दुबेने ८ चेंडूत २६ धावा ठोकताना ३२५ चा स्ट्राइक रेट ठेवला. स्पर्धेत गोलंदाजी ही भारताची थोडीशी लंगडी बाजू होती. कारण सहावा गोलंदाज नव्हता; परंतु बुमराहने ती उणीव फारशी जाणवू दिली नाही. स्पर्धेत त्याने १४ बळी घेतले. अंतिम सामन्यात त्याने १५ धावांत ४ बळी घेतले. तोच सामनावीर ठरला. त्याच्या यॉर्करचा सामना करताना जगातल्या दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडते हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. भारताचे क्षेत्ररक्षण हा चिंतेचा विषय आहे मात्र त्यात हळूहळू सुधारणा होत आहे. सूर्या, हार्दिक, तिलक वर्मा, अक्षर पटेल, इशान किशन यांनी स्पर्धेत काही अद्भूत झेल पकडले आहेत. फलंदाजी ही भारताची फार मोठी शक्ती आहे.

संजू सॅमसनने त्याचे प्रत्यंतर घडवले आहे. भारताचा कोणताही फलंदाज वैयक्तिक स्वार्थासाठी खेळला नाही. तसे असते तर संजू सॅमसनला ९७ वर असताना एक-एक धाव घेत शतक गाठता आले असते; परंतु त्याने वैयक्तिक हित न बघता संघहित महत्त्वाचे मानले. दोन वेळा नव्वदीच्या घरात पोहोचूनही त्याने संघासाठी चौकार -षटकार मारण्याचाच प्रयत्न केला. इशान किशनचेही तसेच. मूळ संघात त्याची निवड झाली नव्हती; परंतु संधी मिळाली आणि त्याने तिचे सोने केले. आजारातून उठलेल्या तिलक वर्माने तुफान फलंदाजी केली. शिवम दुबेच्या वाट्याला फारशी फलंदाजी आली नाही; परंतु संधी मिळाली तेव्हा त्याचा आनंद त्याने प्रेक्षकांना दिला. संपूर्ण स्पर्धेत सूर्या ऑफ कलर होता; परंतु त्याने नेतृत्व उत्तम केले. भारतीय बॅटिंगच्या त्सुनामीत न्यूझिलंड संघ वाहून गेला ही वस्तुस्थिती आहे. या विजयासह टीम इंडियाने अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले. टी-२० विश्वचषकाचे जेतेपद राखणारा भारत जगातील पहिला संघ ठरला. मायदेशात यजमानपद भूषवताना विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश. या पूर्वी असा पराक्रम कोणत्याही यजमान देशाच्या संघाला जमले नाही.

पाच विश्वचषक जिंकणारा भारत हा दुसरा संघ ठरला. भारताने एक दिवसीय दोन (१९८३, २०११) आणि टी-२० तीन (२००७, २०२४, २०२६) असे एकूण पाच विश्वचषक जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वाधिक ७ (वनडे ६ आणि टी-२०- १) जेतेपद आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गुलाबी चेंडूच्या कसोटीत भारतीय महिला पराभूत झाल्या. भारताच्या लक्ष्य सेनला ऑल इंग्लंड खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्यात अपयश आले; परंतु अहमदाबादमध्ये भारतीय संघाने किवीज्चा धुव्वा उडवला. भारताच्या क्रिकेटपटूंना हे जे यश मिळाले त्या मागे कदाचित ‘लाटणे दहशत’ असावी. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय संघानेसुद्धा न्यूझिलंडला ‘बॅट मार’ दिला असावा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR