नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जू खर्गे यांनी राष्ट्रीय आघाडी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये पाच ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक आणि मोहन प्रकाश यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. मुकुल वासनिक यांना समितीचे समन्वयक करण्यात आले आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काँग्रेसने ही समिती स्थापन केली आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसने खास रणनीती आखली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले असताना अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार होते. भाजपने येथे मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर भूमिका दिल्याची चर्चा होती.
तसेच मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. यूपी, पंजाब, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमधील जागांचे वाटप हे विरोधकांसमोरचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत काँग्रेसने समिती स्थापन केली आहे. या बैठकीत जागावाटपाव्यतिरिक्त नवी रणनीती आणि संयुक्त जाहीर सभा यावर मुख्य चर्चा होऊ शकते.