चारठाणा : येथील पेठ विभागातील एका घराला दि.२४ रोजी अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाके झाले. या आगीने शेजारच्या तीन घरांना वेढले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येथील पेठ विभागातील सुमेरचंद हिरप यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीने सारिका हिरप, सूभाष घाटुळ, विठ्ठव बोकन यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी परमेश्वर घाटुळ हे घरातील आग विझविताना खाली कोसळल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती युवा नेते इंद्रजित घाटुळ यांनी जिंतूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलास दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होत जवान सी. पी. राठोड, रोहित देशमुख, शेख शफीक सिध्दार्थ भवाळे, सखाराम घुगे आदींच्या पथकाने आग विझवली. मात्र घरातील जीवनावश्यक वस्तूसह धान्य, शेतमाल, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर साहित्य जळून खाक झाले.
ही आग शॉर्टसर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
















