पुणे : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी शेतीला बसतो. यंदा मान्सूनने सरासरी गाठली नाही. कमी पाऊस झाल्याचा परिणाम रबी हंगामावर झाला आहे. यंदा राज्यात आणि पुणे जिल्ह्यात गव्हाची लागवड कमी झाली आहे. गव्हाची लागवड कमी झाल्यामुळे गहू महाग होणार आहे. यामुळे चपातीचे चटके किचन सांभाळणा-या गृहिणींना बसणार आहेत. आधीच भाकरी महाग झाली आहे. आता चपातीही महाग होणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात गव्हाची पेरणी घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पेरा तब्बल २१ हजार हेक्टरने कमी झाला आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात ४३ हजार ६३७ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. पुणे जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात आतापर्यंत केवळ २२ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. म्हणजेच गव्हाची पेरणी केवळ ५० टक्के भागावर झाली आहे.
यामुळे यंदा गव्हाचे उत्पन्न कमी होणार आहे. गव्हाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे गहू महाग होणार आहेत. यामुळे चपातीचे चटके गृहिणींना बसणार आहेत. जिल्ह्यात यंदा २२ हजार ३१२ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५ हजार ३०० हेक्टरवर जुन्नर तालुक्यात गव्हाची पेरणी झाली आहे तर सर्वांत कमी मावळ तालुक्यात केवळ १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
ज्वारी, बाजरी महाग
किरकोळ बाजारात ज्वारी ७० ते ८० रुपये किलो आहे. बाजरी ४५ ते ५० रुपये किलो आहे. यामुळे आधीच भाकरी महाग झाली असताना गव्हाचा दर यंदा उच्चांक गाठणार आहे. यामुळे भाकरीनंतर आता चपाती महाग होणार आहे. सध्या असलेले ढगाळ वातावरण तसेच काही दिवसांपूर्वी वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसाचा सध्या रबी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. कमी पाऊस आणि धरणांमध्ये अल्प असलेला धरणसाठा यामुळे रबीचे क्षेत्र यंदा कमी झाले आहे. गव्हापेक्षा हरभ-याची लागवड जास्त झाली आहे.