शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
येथील नगरपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या एका स्थापत्य अभियंत्यावर भ्रष्टाचार व मनमानी व गलथान कारभाराचे आरोप करीत त्यांच्याकडील पद्भार काढून घेण्यात यावा, या मागणीसाठी नगरपंचायतसमोर सुधीर नगरसेवक लखनगावे यांनी उपोषण सुरू केले आहे.
नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याकडे २३ एप्रिल रोजी नगरसेवक सुधीर लखनगावे, पाणी पुरवठा सभापती उमाकांत देवंगरे, अर्थ व नियोजन सभापती सौ. श्रीदेवी संभाळे, माजी उपनगराध्यक्षा सौ. सुषमा मठपती, माजी सभापती संतोष शिवणे, श्रीमती पार्वती देवंगरे, सौ.रागिणी शिवणे निवेदन देऊन सदरील मागणी केली आहे. शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या अतिरिक्त स्थापत्य अभियंत्याचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला असून त्यांच्या कारभारात भ्रष्टाचार, मनमानी आणि कार्यालयीन पद्धत चुकीची असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या आहेत. या बाबत विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी यापूर्वीही त्यांच्या विरोधात अनेक लेखी तक्रारी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कडक कारवाई करण्यात आली नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्यांचा शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीतील अतिरिक्त पदभार तात्काळ काढून घ्यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास ३० एप्रिलपासून नगरपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक आमरण साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरसेवकांनी निवेदनातून देण्यात आला होता. त्यानुसार नगरसेवक सुधीर लखनगावे हे उपोषणाला बसले असून जो पर्यंत स्थापत्य अभियंत्याचा पदभार काढून घेणार नाही तोपर्यंत आमरण साखळी उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या उपोषणाला शहरातील जनतेकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून या वेळी बस्वराज मठपती, बस्वराज शिवणे, महादेव आवाळे, अशोक कोरे, संदीप धुमाळे, भागवत नाब्दे, नामदेव लोखंडे, व्यंकट बेंबळगे, प्रतीक पारशेट्टे, चेतन मांदळे, सुरज आवाळे, विशाल सुगावे आदींनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
















