लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांतील एकही शेतक-याला खरीप २०२५ चा पीक विमा अद्यापही मिळाला नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ येत आहेत. शेतक-यांना पेरणीसाठी पैशांची गरज आहे. अशा वेळी पीक विमा मिळाला तर शेतक-यांना आधार मिळेल. परंतू, अद्यापही पीक विमा मिळाला नसल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेने दि. १८ मे रोजी थेट आयसीआयसीआय लोेंबार्ड इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन कंपनीच्या अधिका-यांना घेराव घातला. येत्या आठ दिवसांत पीक विमा शेतक-यांच्या खात्यावर जमा नाही झाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा यावेळी देण्यात
आला.
लातूर जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ७३९ एवढे खातेदार शेतकरी आहेत. ४ लाख ५४ हजार ४०० हेक्टर क्षेत्र होते. खरीप-२०२५ च्या पीक विम्यासाठी ७ लाख १२ हजार शेतक-यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले होते. परंतू, या कंपनीने पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाचे वजन मीसमॅच झाले, रँडम नंबर योग्य वापरला नाही, प्लॉट चुकीचे निवडले, मळणी व्यवस्थित केली नाही, चुकीचे वजन घेतले, पीक कापणी प्रयोग झाले तिथे पीकच नव्हते, असे थातूरमातूर, बालीश आणि बोगस कारणे देत लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप-२०२५ चा पीक विमा नाकारला आहे.
सत्ताधा-यांनीही शेतक-यांना आधार दिला नाही. त्यामुळे सत्ताधा-यांविरोधात शेतक-यांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. अतिवृष्टी, गारपीठ, पुर, दुष्काळ, बोगस बियाणे, खत, बी-बियाणे, खतांच्या वाढत्या किंमती, खतांचा तुटवडा, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव या ना त्या कारणाने शेतकरी सदैव अडचणीत असताना विमा कंपनीनेही शेतक-यांना अडचणीत आणले आहे आणि सरकार म्हणून सत्ताधा-यांनी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. या सर्वांमुळे हताश झालेला शेतकरी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेत आहेत.
आयसीआयसीआय लोेंबार्ड इन्शुरन्स कंपनीने शेतक-यांच्या विरोधात जिल्हा समितीकडे अपिल केले होते. ते अपिल जिल्हा समितीने फेटाळले. त्यानंतर या कंपनीने राज्य तांत्रिक समितीकडे अपिल केले. या समितीनेही विमा कंपनीचे अपिल फेटाळून लावले. दरम्यान १३ मे रोजी मुंबई मंत्रालयात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कृषी आयुक्त, कृषी विभागाचे सचिव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर यांची बैठक घेतली. या बैठकीत विमा कंपनीने केंद्रीय समितीकडे अपिल करणार नसल्याचे आश्वासन देत येत्या आठ दिवसांत लातूर जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन कृषी मंत्र्यांना दिले. त्यामुळे पीक विम्याबाबत शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु, गेल्या ८ दिवसांत पीक विमाच्या संदर्भात आयसीआयसीआय लोेंबार्ड इन्शुरन्स कंपनीने कसलीही हालचाल केली नसल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, आयुब मुजावर यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिका-यांना घेराव घातला.
















