लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि २० मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उद्घाटनानंतर प्रत्येक्ष स्पर्धेला सुरुवात झाली आणि युवकांचा थरार पहावयास मिळत आहेग्रामीण भागातील युवकांमध्ये दडलेली क्रीडा प्रतिभा पुढे आणण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असून, या स्पर्धेची संकल्पना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची आहे.
बुधवारी औसा वॉरियर्स विरुद्ध जळकोट टायटन्स सामन्यात जळकोट टायटन्सने एकतर्फी सामना जिंकला. औसा वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात सर्वबाद ७५ धावा केल्या. जळकोट टायटन्सने एक गडी गमावून केवळ ६.३ षटकात विजयाची नोंद केली. लातूर सीटी किंग्ज इलेव्हन विरुद्ध शिरुर अनंतपाळ स्ट्रायकर सामन्यात लातूर सीटी किंग्ज इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ३ गडी गमावून १२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात शिरुर अनंतपाळ स्ट्रायकरला १० षटकात ५ गडी गमावून १२२ धावा करता आल्या. लातूर सीटी किंग्ज इलेव्हन संघाने केवळ एका धावेने सामना जिंकला.
ग्रामीण इंडियन्स विरुद्ध उदगीर युनायटेड सामन्यात ग्रामीण इंडियन्सने १० षटकात ६ गडी गमावून ९८ धावा केल्या. उदगीर युनायटेडने १० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात ८७ धावा केल्या. ग्रामीण इंडियन्सने ११ धावांनी सामना जिंकला. चाकुर चार्जरस विरुद्ध निलंगा नाईट्स या सामन्यात चाकुर चार्जरसने १० षटकात ६ गडी गमावून १०४ धावा केल्या तर निलंगा नाईट्सला ९ गडी गमावून केवळ ७७ धावा करता आल्या. २७ धावांनी चाकुर चार्जरसने सामना जिंकला. देवणी डेअरडेव्हील विरुद्ध अमदपूर अॅसेसिन्स यांच्यात झाला. या सामन्यात देवणी डेअरडेव्हल्स संघाने १० षटकात ७ गडी गमावून ९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात अहमदपूर अॅसेसिन्सने १० षटकात सर्व गडीबाद ८७ धावा केल्या. देवणी डेअरडेव्हील्सने ५ धावांनी विजयाची नोंद केली. लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेत बुधवारप्रमाणेच गुरुवारीही क्रिकेट सामन्याचा थरार पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहूण क्रीडा प्रेमी भारावून जात आहेत.
















