मंगळवेढा (सोलापूर): सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर आपल्या अभिनयाने आणि गावरान धाटणीच्या रिल्सने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या लोकप्रिय रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) यांनी राहत्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी (२६ मे २०२६) दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे दोघे मिळून ब्रह्मपुरी येथे ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाचा हॉटेल व्यवसाय चालवत होते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या दाम्पत्याने आपल्या हॉटेलमधील रोजच्या कामाच्या, विशेषतः खाद्यपदार्थ बनवतानाच्या रिल्सच्या माध्यमातून मोठी लोकप्रियता मिळवली होती. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये काम करत असताना, रोहिणी यांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. पती निलेश यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
यशाच्या शिखरावर असताना का उचलले टोकाचे पाऊल?
रोहिणी पाराध्ये यांचा हा प्रवास अत्यंत संघर्षाचा होता. त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. पुण्यात काही काळ संसार थाटल्यानंतर, हे दाम्पत्य पुन्हा आपल्या गावी परतले होते. सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या जोरावर त्यांनी आपला हॉटेल व्यवसायही चांगल्या प्रकारे विस्तारला होता. व्यवसाय वृद्धीचे नियोजन सुरू असताना आणि यशाच्या शिखरावर असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय सर्वांनाच अवाक करणारा आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेमुळे मंगळवेढा आणि ब्रह्मपुरी परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पती निलेश पाराध्ये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वाद किंवा व्यवसायातील काही तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर रोहिणी पाराध्ये यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एका उमलत्या रीलस्टारने अशा प्रकारे अकाली जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
















