नवी दिल्ली/संगमनेर: दिल्लीतील राष्ट्रपती भवनाचा तो दरबार हॉल नेहमीप्रमाणेच देशातील दिग्गज शास्त्रज्ञ, राजकारणी आणि उद्योगपतींनी गजबजलेला होता. एकामागून एक नावे पुकारली जात होती. अचानक एक नाव पुकारले गेले—”रघुवीर तुकाराम खेडकर!” आणि समोर आले अंगात नेहरू शर्टआणि चेहऱ्यावर अस्सल मराठी लोककलेचे तेज असलेला एक ६५ वर्षांचा अवलिया.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जेव्हा खेडकरांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला, तेव्हा एकाच वेळी दोन इतिहास घडले. पहिला म्हणजे तमाशाच्या २५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या लोककलेला राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च बहुमान मिळाला; आणि दुसरा म्हणजे वयाच्या अवघ्या ५ व्या दिवशी मंचावर आलेल्या एका कलाकाराच्या ५३ वर्षांच्या खडतर प्रवासाचे चीज झाले.
जन्मताच पायात बांधले गेले घुंगरू!
रघुवीर खेडकर यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. महान तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या पोटी जन्माला आलेल्या रघुवीर यांचा जन्मच तमाशाच्या तंबूत झाला. “माझा जन्म झाला आणि अवघ्या पाचव्या दिवशी मंचावर एका छोट्या बालपात्राची गरज होती. मला तमाशाच्या मंचावर आणले गेले. म्हणजेच, शुद्धीवर येण्यापूर्वीच माझे पाय तमाशाच्या तंबूत रोवले गेले होते,” दिल्लीतील एका मुलाखतीत खेडकर अत्यंत भावूक होऊन सांगत होते. वयाच्या ९ व्या वर्षापासून त्यांनी अधिकृतपणे फडात काम करायला सुरुवात केली. तमाशातल्या ‘सोंगाड्या’ (विदूषक) या पात्राने त्यांना ओळख दिली. सोंगाड्या म्हणजे लोकांना हसवणारा, पण खेडकरांचे आयुष्य स्वतः अनेक दुःखांनी वेढलेले होते.
“आपलं दुःख विसरायचं आणि लोकांना हसवायचं…”
अनेकांना वाटतं तमाशाचे आयुष्य रंगीबेरंगी असते, पण त्यामागे रात्रीचा प्रवास, उघड्यावरचा संसार आणि उपेक्षेची मोठी झळ असते. खेडकरांच्या आयुष्यातही मोठे वादळ आले. त्यांच्या आई आणि पत्नी यांचे अकाली निधन झाले. घर दुःखात बुडालेले असतानाही त्यांना रात्री फडावर जाऊन लोकांना हसवायचे होते. या संघर्षाबद्दल सांगताना ते म्हणतात, “माझी आई नेहमी म्हणायची— लोक तमाशा पाहायला येतात, कारण ते त्यांच्या आयुष्यातील दुःख विसरू इच्छितात. त्यामुळे आपण आपलं दुःख विसरून त्यांना हसवायचं असतं! आईचे हेच शब्द मला आयुष्यभर जगण्याची आणि मंचावर हसण्याची ताकद देत राहिले.”
















