विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील धक्कादायक घटना
विजापूर : वृत्तसंस्था
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात गोविंदपूर (चडचण) येथे गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ६ जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेने विजापूर जिल्ह्यात खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून सहा जणांची हत्या करण्यात आली आहे. गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण घटनेत सहाजणांची गोळ््या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला. या थरारक हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि या प्रकरणी अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे.
















