मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यातील कडक उन्हाच्या झळांनंतर आता १ जून पासून सुरू होणा-या नवीन आठवड्यात हवामानाचा नूर अधिकच बदलणार आहे. आता राज्यात अनेक भागांत वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मात्र, हा पाऊस मान्सूनपूर्व असणार आहे.
बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत अधिकृत मान्सूनच्या आगमनाची कोणतीही शक्यता नाही. कारण अद्याप केरळातही मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार १ जूनपासून राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर हवामानात मोठे बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल. या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. मात्र, आगामी काळात होणा-या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही थेट संबंध नाही. कारण मान्सून अद्याप केरळमध्येच दाखल झालेला नाही, असे हवामान खात्याने सांगितले.
पुरेसा पाऊस पडणे आवश्यक
शेतक-यांनी १ जूनपासून सुरू होणा-या केवळ मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून आपल्या शेतात पेरणीची घाई करू नये. मान्सूनचे अधिकृत आगमन होऊन पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
















