मुंबई : संगीत जगतातून अत्यंत दु:खाची आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली असून आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने २०२३ साली त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव हेमाडी असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत सुमन हेमाडी या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली होती.
सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवेश अत्यंत रंजक होता. त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात गाणं गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वत:च्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. तर मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात ग. दि. माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली.
















