उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला गती देणारा आणि शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून उदगीरसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्चाच्या ४-लेन रिंगरोड प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले असल्याने उदगीर शहर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
उदगीर शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड व हलक्या वाहनांची वाहतूक होत असते. शहरातील वाढती लोकसंख्या, व्यापारी उलाढाल आणि ग्रामीण भागातून येणा-या वाहनांमुळे वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांना होणारा त्रास यामध्ये वाढ झाली होती. ही समस्या लक्षात घेऊन आमदार संजय बनसोडे यांनी मागील अनेक वर्षापासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून उदगीरसाठी स्वतंत्र ४-लेन रिंगरोडची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीस यश मिळाले आहे. मंजूर झालेल्या या रिंगरोडमुळे शहराबाहेरील वाहतूक शहरात न येता थेट मार्गाने पुढे जाऊ शकेल. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.
तसेच औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विकासास चालना मिळून उदगीर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे शहराच्या विविध भागांना अधिक चांगली जोडणी मिळणार असून भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन सदर रिंगरोड उदगीरच्या विकासाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रिंगरोडच्या दोन्ही बाजूंना भविष्यात व्यावसायिक संकुले, औद्योगिक प्रकल्प आणि विविध विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
















