लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना गतवर्षी अतिवृष्टीचा खुप मोठा फटका बसला. परंतू, शेतक-यांना अद्याप पीकविमा मिळाला नाही. पीकविम्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दि. १ जून रोजी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयासमोर चाबुक आंदोलन करण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील केवळ तीन महसूल मंडळातच शेतक-यांना पीक विमा मंजूर झाला आहे. गतावर्षी अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतक-यांचे सोयाबीन पीक पूर्ण खरडून गेले. शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. मात्र रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि औसा तालुक्यातील भादा, बेलकुंड महसूल मंडळातील शेतक-यांना विमा मंजूर झाला. इतर महसूल मंडळातील पीक नुकसानीची दाखलंच घेण्यात आली नाही. याला जिल्हा कृषि कार्यालय आणि आय. सी. आय. सी. आय. लोम्बर्ड विमा कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे उर्वरित शेतक-यांचा पीकविमा तात्काळ देण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीन आज चाबूक आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचा इशारा देणारे निवेदनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना देण्यात आले आहे. या आंदोलनात शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी केले आहे.
















