मुंबई : भिवंडी, पालघर आणि मुंबई येथील तीन आस्थापनांमधून एकूण ८१ लक्ष किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला असून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा सर्जिकल ग्लोव्हज साठा गुणवत्ता चाचणीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार या तपासणी मोहीम कारवाईत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियमांचा भंग करणा-या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या तपास पथकाने मे.साची मेडिक, साकीनाका या आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात परवाने व नोंदणी नसलेल्या व्यावसायिकाने मलेशिया येथून विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हजची आयात करून कोणत्याही परवान्याशिवाय साठवणूक व विक्री केल्याचे उघड झाले. आयात केलेले ग्लोव्हजची वाडा व भिवंडी येथील वैद्यकीय उपकरणे उत्पादन परवाने असलेल्या व्यावसायास पँकिग व लेबलीग करून पुढे त्याची विक्री करण्यास पुरवठा केला असल्याचे आढळून आले. या कारवाईत ७४.८५ रुपये किमतीचे ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ जप्त करण्यात आले. कागदपत्रांनुसार या पेढीने मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना पुरवठा/ विक्री केल्याचे आढळून आले आहे.
कारणे दाखवा नोटिस बजावली
मे.साची मेडिक या संस्थेच्या भिवंडीतील वैद्यकीय उपकरण उत्पादक आस्थापनावर कारवाई करण्यात आली. तथापि तपासणीदरम्यान तेथे ‘वैद्यकीय उपकरणे नियम २०१७’ च्या तरतुदींचा गंभीर भंग झाल्याचे आढळून आले. जनस्वास्थाच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने ९.८८ लक्ष रुपयांचा ग्लोव्हजचा साठा प्रतिबंधित केला असून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय रूग्णालयांना केला पुरवठा
पालघर जिल्ह्यातील वाडा येथील मेडिअर्थ लाईफकेअर आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला, तिथे निर्जंतुकीकरण व इतर उपकरणे नादुरुस्त आहेत, अशा स्थितीत ‘विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज’ खरेदी करून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते निर्जंतुक असल्याचे भासवून शासकिय रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांना पुरवठा करण्यात आल्याची माहिती आस्थापना मालकाने दिली आहे.
बेकायदेशीर साठवणुक
या मोहिमेत कोटयावधीचे विना निर्जंतुकीकरण सर्जिकल ग्लोव्हज वर निर्जंतुक लेबल करून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना महाविद्यालयांना देखील पुरवठा करण्यात आल्याचा गैरप्रकार गंभीर आहे. प्रशासनाने १.२६ कोटी किमतीचा विना निर्जंतुकीकरण बँडेज, रोल बँडेज व कॉटन गौज साठा विक्री व वितरणासाठी प्रतिबंधित केला आहे. तसेच वैध परवाना नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला अॅलोपॅथिक औषधांचा ६.१७ लक्ष किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, हस्तगत केलेल्या अभिलेख्याची पडताळणी सुरु आहे.
















