लवकरच महाराष्ट्र व्यापणार, हवामान खात्याचा अंदाज
पुणे : प्रतिनिधी
मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वा-यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली आहे, असे हवामान विभागाने सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून केरळमध्ये ३ दिवस उशिरा म्हणजेच ४ जून दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनची गती वाढली आहे. काल मान्सून कर्नाटक, तामिळनाडूमध्ये पोहोचला होता. त्यानंतर आज मान्सून कोकण आणि गोव्यात दाखल झाला आहे. आता मान्सून वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे तो लवकरच उत्तरेकडे सरकून मुंबईसह राज्याच्या विविध भागात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागातील हवामानात मोठा बदल झाला आहे. आधी तीव्र उष्णतेनंतर आता काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागात तात्पुरता गारवा निर्माण झाला होता. अशातच आता मान्सून अधिकृतपणे राज्यात दाखल झाला आहे. आता मान्सून उत्तरेकडे सरकून लवकरच संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे.
आज अनेक भागात पावसाची शक्यता
राज्यासह दक्षिण भारतात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
















