लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराच्या नजीक असलेल्या सर्व गावांमध्ये शहरांप्रमाणेच सर्व प्रकारच्या आधुनिक आणि मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यात येतील. गाव ते लातूर शहर आणि मुख्य हाय-वेला जोडणारे रस्ते तातडीने दुरुस्त करून दळणवळण अधिक सक्षम केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
लातूर तालुक्यातील खंडापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते कृष्णा कैले यांच्या निवासस्थानी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ५ जून रोजी सायंकाळी सहका-यांसह सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी खंडापूर ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आणि गावातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
या भेटीदरम्यान माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी गावात चालू असलेले रस्ते, नाली, वीज, शेतरस्ते आणि पाणीपुरवठा यांसह इतर मूलभूत सुविधांच्या कामांची विस्तृत माहिती घेतली. गावक-यांच्या अडीअडचणी व समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्यानंतर, ज्या समस्या तातडीने सोडवणे शक्य आहे, त्यांची वेगळी नोंद घेण्यात आली. तसेच उपस्थित संबंधित विभागाच्या अधिका-यांना या समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या कडक सूचना आमदार देशमुख यांनी केल्या. आगामी काळात गावात राबवायच्या विविध योजनांच्या नियोजना संदर्भात त्यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली आणि दीर्घकालीन उपयोगाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण संवाद बैठकीस लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, तात्यासाहेब देशमुख, राम साळुंखे आणि अक्षय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संजय पाटील खंडापूरकर, चंद्रशेखर दंडीमे, डॉ. सतीश कानडे, भास्कर शिंदे, नारायण ढोरमारे, रमेश थोरमोटे पाटील, केतन कैले, प्रभू कैले, गहिनीनाथ सुडे, नरसिंग बोके, सुरेश जाधव, हंसराज चवळे, पंडितराव लखनगिरे, सुरेश मस्के यांच्यासह ग्रामसेवक बाळासाहेब दुधाटे, कृषि सहायक सोमवंशी, तलाठी दादाराव कांबळे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता एस. आर. स्वामी आणि महावितरणचे शाखा अभियंता एम. डी. तलहा आदी विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कैले कुटुंबीय, मित्रपरिवार व खंडापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















