तेहरान : ओमानच्या किना-यावर गुरुवारी भारतीय क्रू असलेल्या एमटी जलवीर जहाजावर हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर त्याला आग लागली आहे. घटनेनंतर भारतीय दूतावासाने सांगितले की ते स्थानिक अधिका-यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
यापूर्वी, होर्मुज स्ट्रेटजवळ बुधवारी तेल टँकर ‘टळ सेत्तेबेल्लो’वर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात ३ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. याची पुष्टी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. ते म्हणाले की, आतापर्यंत दोघांचे मृतदेह सापडले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने काल सांगितले होते की जहाजावरील २४ भारतीयांपैकी २१ जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे, तर ३ भारतीय बेपत्ता होते. दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये सलग दुस-या दिवशी गुरुवारीही हल्ले सुरू आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने इराणवर ४९ टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली आणि लढाऊ विमानांनीही हल्ले केले.
इराणी क्षेपणास्त्रे हवेत पाडली
जॉर्डनच्या सैन्याने दावा केला की, इराणमधून डागलेली ५ क्षेपणास्त्रे रोखून नष्ट करण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही. तस्रीम न्यूज एजन्सीनुसार दक्षिण इराणमधील जाम परिसरात अमेरिकेचे एमक्यू-९ ड्रोन पाडण्यात आले. अमेरिकेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
होर्मुजजवळ टँकरवर अमेरिकेचा हल्ला
ओमानच्या किना-याजवळ एका तेल टँकरवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आग लागली. जहाजावर २४ भारतीयांसह २८ क्रू मेंबर होते. एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर काही क्रू मेंबर बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.
रशियाचे हल्ले थांबवण्याचे आवाहन
मॉस्कोने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि लष्करी कारवाई थांबवून मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. कतारने प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी आणि अमेरिका-इराण संघर्षावर चर्चा करण्यासाठी आपले शिष्टमंडळ इराणला पाठवले आहे.
















