परभणी : सेलू-परतूर रेल्वे स्थानकादरम्यान सातोना येथील रेल्वे गेटजवळ रेल्वेच्या धडकेत एका वृद्धाचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. रामभाऊ बबन डवले (वय ७५, रा. लिंगसा, ता. परतूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामभाऊ डवले हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. उपचारासाठी ते गुरुवारी सातोना येथे आले होते. दुपारी सुमारे १२.२० वाजता मनमाडहून नांदेडकडे जाणारी रेल्वे गाडी क्र. 57652 सातोना रेल्वे फाटकाजवळ येत असताना डवले हे रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी रेल्वेची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. रामभाऊ डवले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. या प्रकरणाची नोंद रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुदैर्वी घटनेमुळे लिंगसा गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
















