22.9 C
Latur
Monday, December 30, 2024
Homeमहाराष्ट्रआता पाणीही घेणार नाही, जरांगे पाटील यांचा एल्गार

आता पाणीही घेणार नाही, जरांगे पाटील यांचा एल्गार

अंतरवाली : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटलेले असताना आता मनोज जरांगे पाटील यांनी आज आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचे जाहीर करीत आरक्षणाची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जनतेत रोष असल्याचे म्हटले. जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेमुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी रान पेटविणारे मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली (जि. जालना) येथे आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून, मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असतानाच जरांगे पाटील अजूनही त्यांच्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आज त्यांनी आरपारची लढाई असल्याचे सांगत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आंदोलकांना अधिक चिंता आहे. त्यामुळे या आंदोलनाचा आणखी भडका उडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा आरक्षण आणि त्यासाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असून, जरांगे पाटील यांनी तूर्त उपोषण मागे घ्यावे, असा ठराव एकमताने घेण्यात आला. तसेच कायदेशीर बाबी पूर्ण करून टिकणारे आरक्षण देण्याचा ठरावही घेण्यात आला. मात्र, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारची वेळकाढूपणाची भूमिका आहे. त्यामुळे आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असे जाहीर केले. तसेच राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार घेणार नाही, असे म्हटले.

आंदोलकांचा जाणूनबुजून छळ
जरांगे यांनी मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. मला माझ्या जातीवर अन्याय सहन होणार नाही. जाणूनबुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. सरकारचे ऐकून प्रशासन आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप केला.

आजपासून तिसरा टप्पा
मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे, असे सांगत जरांगे पाटील यांनी या आंदोलनाचे सहा-सात टप्पे होणार आहेत. एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.

आता आरपारची लढाई
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर नाराजी व्यक्त केली. उपोषणाला ८ दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा प्रश्न त्यांनी केला. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण आता ही लढाई आरपारची आहे, असे सांगून राज्य सरकारला मोठा इशारा दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR