सध्या देशभरात लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. ज्या तरुणीसोबत आयुष्यभराच्या गाठी बांधायच्या होत्या, त्याच भावी पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा इतक्या क्रूरपणे काटा काढावा, या विचारानेच समाजमन सुन्न झाले आहे. लग्न करायचे नव्हते तर लग्न मोडायचे होते, पण एखाद्याचा निष्पाप जीव कशाला घ्यायचा, हा सर्वसामान्य नागरिकांमधून उमटणारा प्रश्न आजच्या पिढीच्या बदलत्या मानसिकतेवर आणि नैतिक अधोगतीवर विचार करायला भाग पाडणारा आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये केतन आणि सियाचा पुण्यात मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांची तयारी सुरू होती. मात्र, पडद्यामागे एक भयंकर कट शिजत होता. सिया गोयलचे चेतन चौधरी नावाच्या तरुणावर प्रेम होते आणि केतनसोबतचे लग्न तिला मान्य नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे, लग्न मोडल्यास किंवा प्रियकरासोबत पळून गेल्यास घरच्यांची समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी तिने लग्न मोडण्याऐवजी थेट केतनचा गेम करण्याचा भयानक निर्णय घेतला. बदनामी टाळण्यासाठी हत्याकांडाचा मार्ग निवडणारी ही विकृत मानसिकता थक्क करणारी आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पाहिला तर आरोपींचा थंड डोक्याने रचलेला कट आणि त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती स्पष्ट होते. ३१ मे रोजी सिया आणि केतन पहिल्यांदा लोहगडला गेले, तिथे सियाने प्रियकर चेतनची भेट घेऊन हत्येची रूपरेषा आखली होती. केतनने सियाचा वाढदिवस आणि प्री-वेडिंग पार्टी बालीमध्ये साजरी करण्याचे ठरवले होते, मात्र मुंबई विमानतळाकडे निघाले असताना केतनचा पासपोर्ट गूढरित्या हरवला. तपासात समोर आले की, सियानेच तो पासपोर्ट चोरून हॉटेलच्या टॉयलेटमध्ये फ्लश केला होता, जेणेकरून बालीचा प्रवास रद्द होऊन केतनला पुन्हा लोहगडला आणता येईल. त्यानंतर १४ जून रोजी सिया पुन्हा केतनला घेऊन लोहगडवर गेली आणि तिथे त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने केतनने झाडाचा आधार घेतल्याने तो वाचला. त्यावर सियाने जवळ साप आल्यामुळे धक्का लागल्याचे खोटे कारण दिले होते.
अखेर १८ जून रोजी केतनच्या वडिलांचा विरोध असतानाही सियाने भावनिक गळ घालत केतनला पुन्हा लोहगडला नेले. तिचा प्रियकर चेतन आधीच दुचाकीवरून तिथे पोहोचला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि पूर्वनियोजित कटानुसार, १८ जून रोजी दोघांनी मिळून केतनला दरीत ढकलून दिले आणि त्याचा बळी घेतला. दुसऱ्याच दिवशी, १९ जून रोजी महाबळेश्वरच्या रिसॉर्टमध्ये केतनचे कुटुंब सियाचा वाढदिवस साजरा करणार होते, पण त्याआधीच त्यांनी केतनचा आयुष्याचा प्रवास संपवला.
या घटनेने केवळ एका तरुणाचा जीव घेतला नाही, तर नातेसंबंधांमधील विश्वासार्हतेचा खून केला आहे. आजच्या तथाकथित आधुनिक काळातही तरुण पिढी संवाद साधण्याऐवजी किंवा ठामपणे आपला निर्णय सांगण्याऐवजी हिंसेचा मार्ग का निवडत आहे, हा मोठा प्रश्न आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा आणि बदनामी या संकल्पनांचा चुकीचा अर्थ लावून स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त करणे ही मानसिक विकृती आहे. कायदा या गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून देईलच, परंतु हे हत्याकांड नात्यांमधील पोकळपणा आणि ढासळत्या सामाजिक मूल्यांचे एक विदारक चित्र समोर आणणारे आहे.
















