मुंबई : मुंबईच्या भाईंदरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गाडी चालवत असताना एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना प्लेजंट पार्क परिसरात घडली. या घटनेमुळे वाहनांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. मोहित सोनी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून तो भाईंदरमधील प्लेजंट पार्क परिसरात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित आपल्या कारमधून प्रवास करत असताना अचानक गाडीतील एअरबॅग उघडली. कोणतीही मोठी धडक किंवा अपघात न घडता एअरबॅग उघडल्याचे सांगितले जात आहे. एअरबॅग उघडताना झालेल्या तीव्र धक्क्यामुळे मोहितच्या मानेवर गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांच्या मदतीने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
















