पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय मंत्री होणार आहेत, भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्यांना दिल्लीत बोलावून घेणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.सर्वांत आधी मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. तसेच फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेतील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान फडणवीसांच्या दिल्ली वारीच्या या चर्चांवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.
अमृता फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील वर्णीबाबत विचारताच, त्या म्हणाल्या, ‘नाही.. नाही.. मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, त्यामुळे मी त्यांनाही महाराष्ट्रातच ठेवणार..’ त्यांच्या या सूचक विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दरम्यान, यावेळी अमृता फडणवीस यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबतही आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, जोपर्यंत हे आंदोलन नीट पेपरफुटीबाबत आहे, तोपर्यंत ते योग्य आहे.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सरकार पडद्यामागे काम करत होते, आता त्याचे परिणाम दिसत आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट, शिक्षा वाढवणे आणि अन्य बदल आणले जात आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय नको यासाठी सरकार वेगवेगळे नवे नियम आणत आहे.
विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे, तशी पेपरफुटी व्हायला नको, त्यांची मेहनत वाया जाता कामा नये, त्यांच्यावर अन्याय व्हायला नको याची सरकार तसदी घेत आहे असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
















