मुंबई : प्रतिनिधी
वटपौर्णिमेला वडाचे झाड व त्याच्या फांद्या कापू नका, अन्यथा पाच हजार रुपयांपर्यंत दंड व जेलची हवा खावी लागेल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने दिला आहे. त्यामुळे महिलांनी वडाच्या फांदी घरात आणून त्याची पूजा करून दंडात्मक कारवाईचा सामना करण्यापेक्षा वडाची प्रत्यक्ष जाऊन पूजा करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड अथवा फांदी कापणे दंडनीय गुन्हा आहे.
अनधिकृत वृक्षतोड करणा-या प्रत्येक अपराधाकरिता कमीत कमी एक हजारपासून पाच हजार रुपयांपर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. दरवर्षी ‘वटपौर्णिमा’ सणाला वडाच्या झाडाच्या फांद्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे वडाच्या झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल होते.
विक्रेते सार्वजनिक रस्त्यांच्या आजूबाजूची व खासगी आवारातील वडाचे झाड व फांद्या कापतात. त्यामुळे सोमवार, २९ जूनला साजरा होणा-या ‘वटपौर्णिमा’ सणाकरिता कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होऊ नये, याकरिता सतर्क राहण्याचे आदेश सर्व उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. अनधिकृतपणे वडाचे झाड कापताना आढळल्यास अशा व्यक्तीविरोधात नियमानुसार कारवाई करा, असे निर्देशही उद्यान विभागामार्फत देण्यात आले आहेत.
फांद्या कापण्याचे प्रमाण वाढले
वटपौर्णिमेला प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे नोकरदार बायकांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा बायका आदल्या दिवशीच वडाची फांदी घरी आणून पुजतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वडाच्या फांद्या कापून त्यातून उत्पन्न कमावण्याचे प्रमाण वाढल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
















