निलंगा : प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाविरोधात निलंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाचे तुकडे पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नास तीव्र विरोध करण्यात आला असून, प्रस्ताव मागे घेतला जात नाही तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक मारोतीराव कांबळे हे होते. यावेळी विजयकुमार सूर्यवंशी, अर्जुनाप्पा कटके, सूर्यकांत कांबळे, आयुब कुरेशी, शिराज शेख, सोनेराव बनसोडे, पांडुरंग साळुंखे, रणवीर भालके, बालाजी कांबळे, नागनाथ नरहरे, व्यंकट तेलंगे, सुनील आरेराव, हाक सय्यद लालू म्त्रिरी, भाऊसाहेब बनसोडे, दिलीप सूर्यवंशी, विठ्ठल कांबळे, कांतराव कांबळे, सुग्रीव कांबळे, विजय उस्तुरे, दत्तात्रेय सूर्यवंशी, गोरोबा दामाजी, वामन भालके, सत्यनारायण सूर्यवंशी, भगवान कांबळे, बालाजी कांबळे, एम.डी. सूर्यवंशी हे उपस्थित होते.
बैठकीत वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना एकत्रित करून घटनात्मक आरक्षणाचे संरक्षण दिले मात्र, उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रयत्न समाज कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी करण्यात आलेल्या ठरावांमध्ये उपवर्गीकरण हा आरक्षणाचे अस्तीत्व कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करण्यात आले. समाजाच्या ऐक्याला तडा देणारी कोणतीही भूमिका स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच केवळ निवेदने देऊन न थांबता, आरक्षणावर गदा आल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लोकशाही मार्गाने संघर्ष छेडण्याचा इशारा देण्यात आला. आरक्षणाचे विभाजन करण्याऐवजी ते शंभर टक्के प्रभावीपणे लागू व्हावे, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही करण्यात आली. बैठकीस निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनातून आरक्षणाच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
















