लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत विनापरवाना लावण्यात येणा-या अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे तीव्र मोहीम हाती घेतली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यासाठी ही कडक पावले उचलण्यात येत असल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. लातूर महानगरपालिका क्षेत्रात विनापरवाना अनधिकृत होर्डिंग लावणा-यांवर प्रशासनाने कायदेशीर बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात आतापर्यंत १६ एफआयआर दाखल करण्यात आले असून, अनधिकृत बॅनर लावणा-यांकडून मोठ्या प्रमाणात दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेची रीतसर परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे होर्डिंग किंवा बॅनर छपाई केल्यास संबंधित प्रिंटिंग एजन्सींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट नोटीस प्रशासनातर्फे बजावण्यात आली आहे. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका (पीआयएल १५५) संदर्भात जिल्हा प्रशासन अत्यंत गांभीर्याने काम करत आहे. जिल्हाधिकारी, लातूर यांनी वेळोवेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, मुख्याधिकारी, आणि राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता यांच्या उपस्थितीत आढावा बैठका घेऊन कृती आराखडा निश्चित केला आहे. या संदर्भात मनपा आयुक्त आणि पोलीस अधीक्षक, लातूर यांना वेळोवेळी विविध पत्रांद्वारे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याबाबत कळवण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या माध्यमातून
शहरांमधील मुख्य ठिकाणी नोटीस बोर्ड लावून तसेच वर्तमानपत्रांमध्ये जाहीर आवाहन करून अनधिकृत होर्डिंग संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि जाहिरातदारांना प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की, कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी जागेवर अनधिकृतपणे होर्डिंग तसेच बॅनर लावू नयेत. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर यापुढेही फौजदारी व दंडात्मक कारवाई सुरूच राहील.
















