लातूर : प्रतिनिधी
दोन महिन्यांचे वेतन तत्काळ मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकरिता लातूर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी दि. २९ जून रोजी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन महिन्याचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, ७ व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळावी आणि लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय समिती स्थापन करावी, यासह इतर मागण्यांकरिता शहर महानगरपालिका कर्मचा-यांनी सोमवारी काम बंद केले होते.
केवळ काम बंद न करता या सर्व कर्मचा-यांना मनपा इमारतीत ठिय्या आंदोलनही केले होते. कर्मचा-यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही तात्काळ सुरु करण्याची हमी महापालिका आयुक्ता मानसी मीना यांनी दिल्याने कर्मचा-यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
















