नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या आधी देशाची राजधानी हादरवून सोडण्याचा एक मोठा दहशतवादी कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावला आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा हँडलर शहजाद भट्टी याच्या इशा-यावर दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखणा-या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २ परदेशी बनावटीची पिस्तूल, ९ जिवंत काडतुसे आणि ५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसीपी विवेक कुमार त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश राणा आणि अशोक यांच्या पथकाने पंजाब आणि दिल्लीत विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली. शुभदीप सिंग (२३), गुरजंत सिंग (२२), साजन सिंग (२८) आणि गगनप्रीत (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील तिघे पंजाबचे तर एक जण दिल्लीचा रहिवासी आहे. पंजाबमधील अमृतसर येथून शुभदीप सिंगला सर्वप्रथम अटक करण्यात आली आणि त्याच्या चौकशीतून उर्वरित साथीदारांना नावे उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी
सापळा रचत इतरांना अटक केली.
पोलिस तपासात समोर आले आहे की, हे सर्व आरोपी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी परदेशी फोन नंबर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलर्सच्या थेट संपर्कात होते.
शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांचा समावेश
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेली शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची खेप स्वीकारण्याचे काम हे आरोपी करत असत. आरोपी शुभदीप, गुरजंत आणि साजन यांच्यावर पंजाबमध्ये आधीच अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
रेकी करण्यात आली
अटक करण्यात आलेल्या गगनप्रीत नावाच्या आरोपीवर दिल्लीतील महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि पोलिस ठाण्यांची रेकी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याने या संवेदनशील ठिकाणांचे व्हीडीओ बनवून पाकिस्तानी हँडलरला पाठवले होते. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा या टोळीचा डाव होता. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स ऍक्टच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
















