अहमदाबाद : अहमदाबादच्या रस्त्यावर, ट्रॅफिक सिग्नल, मंदीर, मॉल्स आणि हॉस्पिटलबाहेर जी एखादुसरी लहान मुले भीक मागताना दिसतात त्याच्या मागे त्यांची हतबलता नसून ते एक मोठे ट्रॅफिकिंग नेटवर्क आहे. अहमदाबादच्या क्राईम ब्रांचने महानगरपालिकेच्या मदतीने शहर भिकारी मुक्त करण्याची मोहीम उघडली होती. अहमाबादमध्ये २०३० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेतली होती. मात्र या मोहिमेदरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील सरपंच किंवा गावातील प्रमुख व्यक्ती या भीक मागणा-या मुलांचे दलाल झाले आहेत. ते गावातील गरीब कुटुंबातील मुले भीक मागण्याच्या या धंद्यात भरती करून घेतात. त्यानंतर त्यांना गुजरातमध्ये भीक मागण्यासाठी पाठवले जाते. पोलिसांनी या रॅकेटद्वारे शहरात २७६ मुलांची तस्करी करण्यात आल्याचे शोधले आहे. अधिका-यांनी सांगितले की, या मुलांना आता सरकारी शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. तसेच त्यांना जेवण आणि राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानंतर आथा ज्यांनी या मुलांचे शोषण केले त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुले आंतरराज्यीय टोळीचा भाग
अहमदाबाद क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की ही मुले आंतरराज्यीय टोळाचा एक भाग आहे. यातील सर्व मुले अशीच भीग मागत नाहीयेत. यातील अनेक मुले ही अत्यंत गरीब घरातून येतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनीच मोठया शहरात इथे भीक मागायला पाठवले आहे.
















