जळकोट : प्रतिनिधी
जळकोट मंडळात यंदाच्या जून महिन्यात तब्बल १८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा पाऊस विक्रमी ठरला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामास चांगली सुरुवात झाली तर जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळात १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .
सततच्या पावसामुळे जळकोट तालुक्यातील बहुतांश भागात पेरण्यांना वेग आला असून आता पेरण्या पूर्णत्वाकडे पोहोचल्या आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस तसेच इतर खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे पिकांची उगवणही समाधानकारक होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, झालेल्या पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठे तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही आगामी काळात पाण्याची उपलब्धता राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कृषी विभागाने शेतक-यांना पिकांची नियमित पाहणी करावी, तणनियंत्रण आणि खत व्यवस्थापन वेळेवर करावे, तसेच पाण्याचा योग्य निचरा ठेवण्याचे आवाहन केले आहे. जून महिन्यातील या विक्रमी पावसामुळे जळकोट तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि जलसाठ्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतक-यांच्या आशा अधिक बळावल्या आहेत.
















