लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेत प्रशासक जाऊन पदाधिका-यांचा कारभार सुरू झाला आहे. अशातच निवडणूकीच्या आचार संहितेमुळे अनेक बैठका या विना प्रभावी निर्णयाअभावी पार पडत होत्या. आता आचार संहिता संपल्याने सोमवारी स्थायी समितीची सभा होत आहे. तर मंगळवारी जिल्हा परिषदेत पहिल्यांदा पदाधिका-यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेला गेल्या चार वर्षात प्रशासक राज असल्याने केंद्र शासनाचा १५ वित्त आयोगाचा जवळपास ४८ कोटी रुपयांचा निधी खर्चासाठी आला नाही. सार्वत्रीक निवडणूका होऊन सदस्य निवडून येताच केंद्र शासनाने १५ वित्त आयोगाचा कोटयावधी रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला तात्काळ वर्ग केला आहे. त्यामुळे त्या-त्या गटातून सदस्य निवडून आल्याने त्या भागांचे विकास कामे मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे.
प्रशासक काळानंतर पदाधिका-यांची पहिलीच सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभाग्रहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळावार दि. ७ जुलै रोजी पार पडणार आहे. या सभेत मागील दि. १२ मार्च २०२६ व दि. १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या बरोबरच बांधकाम, शिक्षण, यांत्रिकी, कृषि, पंचायत, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विषय मांडून या सर्वसाधारण सभेत मंजूरी घेतली जाणार आहे. या सभेला उपस्थित राहवे म्हणून जिल्हा परिषद व इतर अशा ३४ विभाग प्रमुखांना कळवण्यात आले आहे.
















