लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका अतिक्रमणविरोधी पथक, महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील रजिस्ट्री कार्यालयाच्या परिसरातील अतिक्रमण दि. ३ जुलै रोजी पुन्हा एकदा काढण्यात आले. यामुळे रजिस्ट्री कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सरकारला मोठा महसूल मिळवून देणा-या या परिसरात दोन रजिस्ट्री (नोंदणी) कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या परिसरात मोठ्याप्रमाणात मुद्रांक विक्रेते, बॉण्ड रायटर यांनी टप-या टाकुन, टेबल मांडून अतिक्रमण केले होते. काहींनी तर वाहनाच्या पार्कींग शेडमध्येही अतिक्रमण केले होते. याच परिसरातील मोकळ्या जागेत चहा, नाष्टा इतकेच नव्हे तर शासनाने प्रतिबंध केलेला गुटखासुद्धा विकला जात होता. सुमारे ३-४ महिन्यांपुर्वी महानगरपालिकेने हेच अतिक्रमण काढले होते. परंतू, थोडा कालावधी जाताच पुन्हा पुर्वीप्रमाणेच अतिक्रमण झाले.
अतिक्रमण पुन्हा वाढल्याचे लक्षात येताच लातूर शहर महानगरपालिका अतिक्रमणविरोधी पथक, तहसील कार्यालय लातूर व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करीत हे अतिक्रमण काढले. या परिसरात अक्षरश: मुद्रांक विक्रेत्यांनी अनधिकृतपणे पत्र्यांचे शेड मारले होते. जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याचे सुमारे २० शेड उध्वस्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांत मुद्रांक विके्रत्यांच्या दुकानांवर अशी कारवाई करण्यात आलेली आहे. वारंवार होत असलेल्या अशा कारवायांमुळे मुद्रांक व्यवसायिक संभ्रमात आहेत. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात छोटे-छोटे हॉटेल्स मोठ्या प्रमाणात आहेत. चहा, नाष्टा, पान, तंबाखू, गुटखा, सिगारे सर्वच या ठिकाणी मिळते. शासनाच्या जागेवरच शासनाने प्रतिबंध केला गुटखा विकला जातो आहे. त्याचा त्रास शासकीय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना होतो आहे.
















