तेहरान : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या आठवडाभर चालणाऱ्या अंत्यसंस्कार सोहळ्याला आज, शुक्रवारी राजधानी तेहरानमध्ये भावूक वातावरणात सुरुवात झाली. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले खामेनी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी तेहरानमधील ‘इमाम खोमेनी ग्रँड मुसल्ला’ या विशाल प्रार्थनागृहात ठेवण्यात आले आहे. यावेळी इराणचे वरिष्ठ नेते, धर्मगुरू, लष्करी अधिकारी आणि परदेशी राजनैतिक प्रतिनिधींसह लाखो नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. खामेनी यांच्या ३७ वर्षांच्या राजवटीचा अंत २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या युद्धातील पहिल्याच हवाई हल्ल्यात झाला होता. इस्लामिक प्रजासत्ताकाबद्दलची निष्ठा आणि क्रांतिकारी उत्साह दाखवण्यासाठी सरकारने या भव्य अंत्यसंस्कारांचे आयोजन केले आहे.
इस्लामिक परंपरेनुसार मृत्यूनंतर २४ तासांच्या आत दफनविधी केला जातो; मात्र युद्धजन्य परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा सोहळा लांबणीवर पडला होता. गेल्या महिन्यात झालेल्या अंतरिम युद्धविराम करारानंतर आता हा कार्यक्रम होत आहे. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, सोमवारी मध्य तेहरानमध्ये लाखो नागरिकांच्या उपस्थितीत मुख्य अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यानंतर मंगळवारी पार्थिव इराणमधील शिया धार्मिक शिक्षणाचे केंद्र असलेल्या कोम शहरात नेले जाईल. बुधवारी पार्थिव शेजारील देश इराकमधील शिया धर्मीयांची पवित्र स्थळे असलेल्या नजफ आणि कर्बला येथे नेण्यात येईल. अखेरीस गुरुवारी इराणमधील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मशहद येथील इमाम रझा यांच्या दर्ग्याजवळ खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, ज्यानंतर हा शोकसोहळा समाप्त होईल.
खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागतिक स्तरावरील अनेक प्रमुख नेते तेहरानमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव, चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे उपप्रमुख हे वेई, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इराकचे राष्ट्राध्यक्ष निझार अमेदी यांचा समावेश आहे. तसेच लेबनॉनच्या हिजबुल्लाह संघटनेचे दिवंगत नेते हसन नसरल्लाह आणि कमांडर इमाद मुघनिया यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. इराणचे राष्ट्राध्यक्ष, संसदेचे अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री आणि नवीन क्रांतिकारी रक्षक दलाचे प्रमुख अहमद वाहिदी यांच्यासह अनेक लष्करी जनरल पार्थवासमोर नतमस्तक झाले.
खामेनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतातून एक विशेष सर्वधर्मधर्मीय शिष्टमंडळ इराणमध्ये दाखल झाले आहे. भारतामधील इराणी दूतावासाने या दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि विविधतेची अनोखी झलक पाहायला मिळत आहे. शुक्रवारी भारतामधून गेलेल्या या विशेष प्रतिनिधींनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन ‘खिराज-ए-अकीदत’ (आदरांजली) वाहिली. या शिष्टमंडळात भगवे वस्त्र परिधान केलेले हिंदू धर्मगुरू, पगडीधारी शीख धर्मगुरू आणि ख्रिश्चन धर्मगुरूंचा समावेश असून, त्यांच्या या एकत्र येण्याने भारताच्या सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवले आहे.
२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ज्या हल्ल्यात खामेनी मारले गेले, त्याच हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृत्यू झाला होता. मुख्य सभागृहात खामेनी यांच्या शवपेटीशेजारीच त्यांची मुलगी, जावई, लहान नात आणि त्यांचा मुलगा मोजताबा यांच्या पत्नीची पार्थिवेदेखील दर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या इसफाहान येथील अठरा वर्षीय विद्यार्थिनी मोबिना रझाघी हिने भावना व्यक्त करताना सांगितले की, देवाच्या इच्छेने आमच्या नेत्याच्या रक्ताचा सूड घेतल्याशिवाय आणि न्याय मिळाल्याशिवाय लोकांचे हे दुःख थोडेही कमी होणार नाही.
हा अंत्यसंस्कार सोहळा इराणसाठी अत्यंत संवेदनशील आणि गंभीर क्षणी होत आहे. इराण गेल्या अनेक वर्षांपासून कडक आर्थिक निर्बंध आणि अंतर्गत असंतोषाचा सामना करत आहे. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यातच इराणमधील मोठ्या आंदोलनांमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत हजारो निदर्शक मारले गेले होते, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांबिरोधात जनक्षोभ आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय एकता आणि सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने हे शक्तिप्रदर्शन आयोजित केले आहे. अंत्ययात्रेत देशभरातून लाखो लोक सहभागी व्हावेत यासाठी हॉटेल्समध्ये पन्नास टक्के सूट, मोफत वाहतूक, अन्न आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
खामेनी यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र मोजताबा खामेनी हे इराणचे नवे सर्वोच्च नेते बनले आहेत. मात्र, वडिलांचा मृत्यू झालेल्या त्याच हवाई हल्ल्यात मोजताबा हेदेखील जखमी झाले होते आणि तेव्हापासून ते सार्वजनिक रित्या किंवा कोणत्याही छायाचित्रात दिसलेले नाहीत, ज्यामुळे नव्या नेतृत्वाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
















