लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी शुक्रवार दि. ३ जुलै रोजी वरवंटी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. मनपा शाळेलाही त्यांनी भेट दिली.
आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी गुरुवारी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. दुस-याच दिवशी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली. ओल्या कच-यावर प्रक्रिया करून तयार केलेले कंपोस्ट खत तसेच सुका कचरा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प व जुन्या साठलेल्या कच-यावर प्रक्रिया करणा-या प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया करण्यासाठी पूर्णपणे विलगीकृत कचरा येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या प्रक्रियेत काम करत असताना कर्मचा-यांनी पूर्णपणे किटचा वापर करावा, असा आदेशही त्यांनी दिला. याप्रसंगी मनपा उपायुक्त वसुधा फड, कनिष्ठ अभियंता गणेश देवणीकर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रमुख धोंडीबा सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
आयुक्तांनी शहरात मनपाच्या वतीने चालविल्या जाणा-या सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्र. ९ ला भेटी दिली.तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मनपा शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना संदर्भात त्यांनी चर्चा केली. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच विविध ठिकाणी भेटी देऊन कामकाजाची माहिती घेत आहेत.
















