लातूर : प्रतिनिधी
गुन्हे घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हे होण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध घालणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ करणे, या उद्देशाने लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेला पोलीस आपल्या सोसायटीमध्ये हा अभिनव उपक्रम नागरिकांच्या मोठया प्रतिसादात यशस्वीपणे सुरू आहे. १५ जून २०२६ पासून प्रारंभ झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीतच शहरी भागातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट केली असून पोलीस दलाविषयीचा विश्वासही वृद्धिंगत केला आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम पोलीस अधिकारी तसेच संबंधित बीट अंमलदार यांनी आतापर्यंत १०० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांना, रहिवासी एरियाना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि सुरक्षिततेबाबत आवश्यक मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सध्याच्या बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक वातावरणात नागरिकांनी स्वत:ही सतर्क राहणे ही काळाची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेला पोलीस आपल्या सोसायटीमध्ये हा उपक्रम प्रतिबंधात्मक पोलीसिंगचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून सुरक्षित, सायबर सजग आणि गुन्हेमुक्त लातूर घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसराच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करावे. नागरिकांचे सहकार्य आणि पोलिसांची तत्परता यांच्या बळावर सुरक्षित, सक्षम आणि विश्वासपूर्ण समाजव्यवस्था उभारण्याचा संकल्प अधिक प्रभावीपणे साकार होईल.
















