मुंबई: “माननीय शरद पवार हे मोठे आणि आदरणीय नेते आहेत. पण ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली (दालनात) जाऊन पक्षाच्या बैठका घेतल्या, तर यामुळे मोठ्या नेत्याची आणि पक्षाची विश्वासार्हता कमी होते,” अशा अत्यंत कडक शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. शरद पवारांनी विधानभवनात घेतलेल्या एका बैठकीवरून महाविकास आघाडीमध्ये (मविआ) ठिणगी पडल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या या कृतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली.
…तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात गेलो असा अर्थ होईल!
बुधवारी विधानभवनात सीमाप्रश्नासंदर्भात एक बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी आलेले शरद पवार यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन आपल्या पक्षाची (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) बैठक घेतली. यावर आक्षेप घेत राऊत म्हणाले, “ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली, त्यांच्या दालनात बैठक घेणे योग्य नाही. अख्खं विधानभवन काय ओस पडलं होतं का? तिथे समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे, वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. मग विधिमंडळात गद्दारांच्या छताखाली जाऊन अशा बैठका का घेतल्या जातात?”
ते पुढे म्हणाले, “उद्या जर आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन अशी बैठक घेतली, तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात गेलो, असा अर्थ लोक काढतील. म्हणूनच मविआच्या सर्वच घटकपक्षांनी काही नियम आणि राजकीय पथ्य पाळायला पाहिजेत.”
आम्ही इतके सहिष्णू नाही, आमचे मन एवढे मोठे नाही!
आपल्या मनातील अस्वस्थता उघड करताना संजय राऊत म्हणाले, “हे आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मत आहे. आम्ही इतकेही सहिष्णू नाही आणि आमचे मन एवढे मोठे नाही. ज्यांचे मन मोठे आहे त्यांनी ते करावे, पण यामुळे सामान्य जनतेमध्ये पक्षाची विश्वासार्हता घसरते. शरद पवारांच्या या कृतीमुळे शिवसेनेचे (ठाकरे गट) सर्वच कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. आम्ही जर त्यांच्या जागी असतो, तर अजितदादांनी शरद पवारांशी केलेली बेईमानी लक्षात ठेवून कधीही त्यांच्या दालनात पाऊल ठेवले नसते.”
गद्दारांना प्रतिष्ठा देऊ नका!
“शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांना शासकीय कामासाठी भेटणे यामध्ये काहीही गैर नाही,” असे स्पष्ट करत राऊत पुढे म्हणाले, “पण त्यांच्या दालनात जाऊन स्वतःच्या पक्षाची बैठक घेणे म्हणजे तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देण्यासारखे आहे. जर तुम्हीच गद्दारांना अशी प्रतिष्ठा देणार असाल, तर उद्या तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली, त्याबाबत तुम्हाला जाहीरपणे बोलण्याचा नैतिक अधिकार उरणार नाही,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
















