मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेतील कथित गैरव्यवहारावर सडकून टीका केली. ९२ लाख महिलांची नावे वगळली, १४ हजार कोटी रुपये या योजनेतून वितरित करण्यात आले, असे म्हणत त्यांनी याबाबत कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले.
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, कोणतीही केवायसी किंवा छाननी न करता २९ हजार पुरुष आणि ४५०० सरकारी कर्मचा-यांनी या योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मते विकत घेण्यासाठी सरकारी पैशांचा केलेला हा सुमारे ३,५१५ कोटी रुपयांचा अपहार आहे.
शेतक-यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी योजना नाही, आश्रमशाळांना निधी नाही, दिव्यांगांचे पैसे अडकले आहेत आणि तुम्ही ३,५१५ कोट रुपये मते विकत घ्यायला लुटता. हा पैसा तुमच्या बापाचा आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ‘हे सर्व पैसे वसूल करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या तत्कालीन संपूर्ण मंत्रिमंडळावर तसेच तत्कालीन मुख्य सचिव, अर्थसचिव आणि महिला व बालकल्याण सचिव यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.
या अधिका-यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून या पैशांची वसुली व्हायला हवी, असे ते म्हणाले. याप्रकरणी शिवसेना राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. तसेच, गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
















