हिमायतनगर : तालुक्यातील कामारी जिल्हा परिषद शाळेतील मनमानी कारभाराचे वास्तव दि. १४ जुलै रोजी उघड पडले. शाळेची वेळ होऊनही काही शिक्षकांना पत्ताच नव्हता. अखेर नेहमीप्रमाणे लेटलतिफ शिक्षक दाखल होताच संतप्त पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर संबंधित शिक्षकांना घेराव घालत जाब विचारला. सकाळी शाळा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही अनेक विद्यार्थी शाळेच्या गेटबाहेर शिक्षकांची वाट पाहत उभे असल्याचे चित्र पाहून पालकांचा संताप अनावर झाला होता.
मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांची वेळ सकाळी ७ ते १२ अशी निश्चित केल्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शिक्षकांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात काही शिक्षकांकडून या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. दि. १४ जुलै रोजी कामारी जिल्हा परिषद शाळेवर सकाळी ७ वाजता काही शिक्षक हजर झाले परंतू सकाळी नऊ वाजल्यानंतर ही काही शिक्षक शाळेत हजर झालेच नाही. अनेक विद्यार्थी शाळेच्या बाहेर ताटकळत बसल्याचे पाहून पालक संतप्त झाले. अखेर लेटलतिफ शिक्षक हळूच अवतरताच पालकांनी या शिक्षकांना शाळेच्या गेटवर घेराव घालून जाब विचारला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामारी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून येथे सुमारे ३०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर शाळेत १५ शिक्षकांची नियुक्ती असल्याची माहिती आहे.
















