नांदेड : प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात अवघ्या दीड महिन्यांत कालावधीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल १० खुनांच्या घटना घडल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. १ जून ते १५ जुलै २०२६ दरम्यान हदगाव, मुखेड, भोकर, मरखेल, अर्धापूर, विमानतळ, वजीराबाद तसेच नांदेड शहरातील विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व ३६ पोलीस ठाण्यांमध्ये डीएसबीचे कर्मचारी कार्यरत असतात. त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील घडामोडी, सामाजिक तणाव, राजकीय हालचाली, व्यावसायिक वाद, गुन्हेगारी टोळ्यांची हालचाल, संवेदनशील व्यक्ती व भागांची माहिती गोपनीय पद्धतीने संकलित करून वरिष्ठ पोलीस अधिका-यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असते. संभाव्य गुन्हे, वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणा-या घटनांची पूर्वकल्पना मिळवून योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यामध्ये या शाखेची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
मात्र अल्प कालावधीत सलग गंभीर स्वरूपाच्या हत्या घडत असताना या शाखेकडून वेळेत आवश्यक गुप्त माहिती मिळाली का? संवेदनशील भागांची जोखीम ओळखण्यात त्रुटी राहिल्या का? संभाव्य वादग्रस्त व्यक्तींवर पुरेशी देखरेख ठेवण्यात आली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
















