नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि सीबीएसईमधील गोंधळाप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जंतरमंतरवर सुरू असलेल्या या उपोषणाला ‘३ इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटातील ‘चतुर रामलिंगम’ म्हणजेच अभिनेता ओमी वैद्य याने जाहीर पाठिंबा दिला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणा-या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, उपोषणादरम्यान वांगचुक यांचे वजन तब्बल ८ किलोने कमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर ओमी वैद्यने सोशल मीडियावर एक व्हीडीओ शेअर करत देशवासीयांना या संवेदनशील विषयावर बोलण्याचे आवाहन केले. मला फुन्सुक वांगडूने मरावे असे वाटत नाही, असे ओमी वैद्य आपल्या व्हीडीओमध्ये म्हटले आहेत.
हॅलो इडियट्स, ओळखलंत का? मी ओमी वैद्य, म्हणजेच ‘३ इडियट्स’मधील चतुर आणि ‘द ऑफिस’मधील सादिक. माझ्याकडे तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. मी सहसा असे व्हीडीओ बनवत नाही, चित्रपटातील आमीर खानने साकारलेली ‘फुन्सुक वांगडू’ ही लोकप्रिय व्यक्तिरेखा ख-या आयुष्यात सोनम वांगचुक यांच्यावरच आधारित आहे, याची आठवण ओमीने करून दिली. ते म्हणाले, ३ इडियट्समधील फुन्सुक वांगडू हे पात्र लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरून प्रेरित आहे. मी त्यांना भेटलो आहे, ते अतिशय साधे आणि अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीवर चिंता व्यक्त करताना ओमी म्हणाले, ते सध्या दीर्घकालीन उपोषणावर आहेत. त्यांची रक्तातील साखरेची पातळी अत्यंत कमी झाली आहे. प्रसारमाध्यमे या विषयाला कितपत प्रसिद्धी देत आहेत मला माहीत नाही, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. ते लडाखची स्वायत्तता, शिक्षण आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढा देत आहेत. तुमचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात, पण या माणसाचा जीव जाणे योग्य नाही. प्रत्येकाने काही वेळ काढून या विषयाचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी व्हीडीओच्या माध्यमातून केले आहे.
















