अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता जम्मू-कश्मिरमधील माता वैष्णोदेवी मंदिरातील चांदीच्या अर्पणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सुमारे ५५० कोटी रुपयांच्या चांदीपैकी तब्बल ९५ टक्के धातू बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जम्मूच्या मुख्य न्यायिक दंडाधिका-यांच्या न्यायालयाने जम्मू-काश्मीर गुन्हे शाखेला (क्राईम ब्रांच) संबंधित सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मे महिन्यात श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने मंदिरात जमा झालेली सुमारे २० टन चांदी वितळवण्यासाठी आणि सुरक्षित साठवणुकीसाठी सरकारी टांकसाळीत पाठवली होती. या चांदीची अंदाजे किंमत ५५० कोटी रुपये होती. मात्र, धातूची तपासणी करताना धक्कादायक बाब समोर आली. पाठवण्यात आलेल्या चांदीपैकी केवळ ५ टक्केच शुद्ध चांदी असल्याचे निष्पन्न झाले, तर उर्वरित धातूमध्ये कॅडमियम आणि लोखंडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्याचे सांगण्यात आले आहे.
सुरुवातीला भाविकांनी नकळत बनावट चांदी अर्पण केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अॅडव्होकेट दीपक शर्मा यांनी हा दावा फेटाळून लावत मंदिरात अर्पण झालेल्या ख-या चांदीची अदलाबदल करून तिचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ९ मे रोजी जम्मू-कश्मिर गुन्हे शाखेच्या महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करून गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, अपहार आणि सरकारी नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणी एफआयआर दाखल करून सखोल तपास करण्याची मागणी केली.
















