श्रीनगर : जम्मूच्या विशेष न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्या विरोधात पहलगाम प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, निष्पक्ष चौकशीसाठी हाफिज सईदला ताब्यात घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. न्यायालयाने ८ जुलै रोजी आदेश जारी केला होता, ही माहिती मंगळवारी समोर आली आहे.
यापूर्वी ६ जुलै रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने पहलगाम हल्ल्यासंदर्भात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. एजन्सीने म्हटले होते की, बैसरनघाटीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट हाफिज सईदनेच रचला होता. एनआयएने हाफिजवर भारताच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांची हत्या केली होती. या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले होते. यानंतर भारताने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हल्ला केला होता. भारताचा दावा आहे की यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
पहिले आरोपपत्र १५ डिसेंबर रोजी दाखल
पहलगाम हल्ल्यानंतर एनआयएने १५ डिसेंबर २०२५ रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात पाकिस्तानचा दहशतवादी हँडलर साजिद जटसह ६ दहशतवाद्यांना आरोपी बनवले होते. त्यावेळी हाफिज सईदचे नाव समोर आले नव्हते. पहलगाम हल्ल्यातील ३ दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा हँडलर सैफुल्लाह जट्ट उर्फ लंगडा अजूनही जिवंत आहे. त्याच्यावर १० लाखांचे बक्षीस आहे.
















