कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगनाजवळ बंगालच्या उपसागरात बुडालेल्या एका ट्रॉलरमधून आठ दिवसांनंतर ९ मच्छिमारांचे मृतदेह सापडले आहेत. सहा मच्छिमार अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
जय माँ काली नावाचा ट्रॉलर २ जुलै रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील शंकरपूर मासेमारी बंदरातून १५ मच्छिमारांना घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघाला होता. ६ जुलै नंतर ट्रॉलरशी संपर्क तुटला होता. अधिका-याने सांगितले की, समुद्रात अनेक दिवस राहिल्यामुळे मृतदेह खूप कुजले आहेत आणि त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. आता त्यांची ओळख डीएनए तपासणीनंतरच पटू शकेल. पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनानुसार, पोलिस आणि भारतीय तटरक्षक दलाने आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी बक्खाली किना-यापासून ३५ किलोमीटर दूर बाघेर चारजवळ बुडालेल्या ट्रॉलरचा शोध लावला. रविवारी मासेमारी करणा-या इतर ट्रॉलर्सच्या मदतीने तो पाथरप्रतिमा येथील सीतारामपूर किना-यापर्यंत आणण्यात आला. त्यानंतर रात्रभर चाललेल्या बचाव मोहिमेत ट्रॉलरमधून ९ मच्छिमारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, बंगालच्या उपसागरातील खराब हवामानामुळे ट्रॉलर उलटल्याचा अंदाज आहे. तथापि, अपघाताचे खरे कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल.
















