रावळपिंडी : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते! हे शब्दही बोचावेत असे वास्तव सध्या पाकिस्तानात आणि विशेषत: रावळपिंडीत आहे. एकीकडे पाकिस्तान सरकार जगभर मोठायकी करत फिरतेय, शांतता समझोत्यांमध्ये मध्यस्थी करतेय. ‘आपल्याशिवाय ट्रम्प यांचे पान हलत नाही,’ म्हणत पंतप्रधान आणि लष्करप्रमुख तो-यात फिरत आहेत. अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करत अफगाणी लोकांना ‘तंदूर’ म्हणत हिणवत आहेत आणि दुसरीकडे देशात जिवंतपणीच नाही तर मेल्यावरही माणसांच्या वाट्याला फक्त परवडच येते आहे.
पाकिस्तानी माणसांच्या वाट्याला आपले जीवलग गमावाल्यावरही काय मरणयातना येत आहेत, अर्थातच जगभर त्याच्या बातम्या झाल्या. पाकिस्तानातली महागाई अगदी माणसांच्या कबरीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. आपल्या जीवाभावाच्या माणसांना शेवटचा निरोप देतानाही अनेकांना याच्या-त्याच्याकडे हात पसरावे लागत आहेत, कर्ज काढावे लागत आहे. त्यात आता देशाच्या आणि विविध प्रांतांच्या नव्या अर्थसंकल्पात सरकारने नवे कर लागू केले. त्याचा फटका बाकी गोष्टींना तर बसलाच, पण अन्त्यसंस्कारांसाठी होणारा खर्चही वाढला. पूर्वी काही लोक विनामोबदला कबर खणून देत, तेही आता उरलेले नाहीत. त्यामुळे त्यासाठीही पैसे मोजावे लागतात. विटा-सिमेंटची साधी कबर, संगमरवरी कबर यासाठी अधिक पैसा खर्च करण्यावाचून पर्याय नाही. त्यात समाजाचा दबाव असल्याने सर्व रीतीभातीनुसार करावेच लागते.
दफनविधीनंतर नातेवाइकांसह समाजातील लोकांना देण्यात येणा-या भोजनासाठीच्या खर्चातही वाढ झालेली आहे. अजूनही अनेक लोक बँकेत खाते उघडत नाहीत. महागाई जास्त, क्रयशक्ती कमी यामुळे कर्जबाजारी होत सावकारांच्या तडाख्यात अडकणा-यांची संख्याही मोठी आहे.
कफन-दफनसाठी लोकांकडे पैसे नाहीत
कफन-दफन करायला अनेकांकडे पैसे नाहीत, कबरीसाठी जागा घ्यायची तर आता पैसे नाहीत, अन्त्ययात्रेसाठी आवश्यक सामान आणायला पैसे नाहीत. अशावेळी उधार-उसनवारी करून गरज भागवली जाते. माणसे एकमेकांना मदतही करतात. पण आधीच पिचलेल्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर वाढत जातो.
जगासमोर पाक पडतोय उघडा
अनेक माणसे जगासमोर आपली व्यथा अशी जाहीर मांडत असताना सरकार अर्थातच असे काही नाही-हा पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्याचाच डाव आहे! असे म्हणत नामानिराळे होत आहे. सरकारी आकडेवारी तर ताज्या आर्थिक सर्वेक्षणात देशाचे आणि अर्थव्यवस्थेचे आशावादीच चित्र मांडते आहे.
















