चाकूर : प्रतिनिधी
पंचायत समितीच्या कामकाजाबाबत कोणत्याही नागरिकास तक्रार अथवा अडचण असल्यास ती थेट माझ्याकडे नोंदवावी. प्रत्येक तक्रारीचे निष्पक्षपणे निराकरण करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम आम्ही सर्व लोकप्रतिनिधी करू, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे यांनी केले आहे.
चाकूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मागील काही दिवसांपासून पंचायत समितीतील कथित भ्रष्टाचाराबाबत समाजमाध्यमांवर विविध आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. सभापती जयश्री नागरगोजे म्हणाल्या, पंचायत समितीबाबत होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वीच्या प्रशासक काळातील बाबींचा संबंध आमच्याशी जोडला जात आहे. पंचायत समितीच्या कामकाजात शिस्त आणण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही समस्या असल्यास सभापती, उपसभापती किंवा पंचायत समिती सदस्यांशी थेट संपर्क साधावा. त्यांच्या समस्यांचे प्रामाणिकपणे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व इतर नेत्यांवर करण्यात येणा-या आरोपांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे आरोपांचे ठोस पुरावे असतील त्यांनी ते समोर आणावेत. अन्यथा अशा बिनबुडाच्या आरोपांना कोणताही अर्थ उरत नाही. यावेळी उपसभापती भुजंग शिंदे यांनीही पंचायत समितीच्या कामकाजाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, पंचायत समितीच्या प्रशासनात शिस्त आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गटविकास अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळेच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. लवकरच नवीन गटविकास अधिकारी रुजू होतील आणि नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण केले जाईल.काही राजकीय नेत्यांनी विशिष्ट व्यक्तींचीच बिले काढल्याचा आरोप केल्याबाबत शिंदे म्हणाले की, असा एकही लाभार्थी त्यांनी दाखवावा, ज्याचे बिल आम्ही नियमबा पद्धतीने काढले आहे. उलट आरोप करणा-या पक्षातील कार्यकर्त्यांच्या शिफारशीनुसार अनेकांची प्रलंबित बिले अदा करण्यात आली असल्याचे उपसभापती भुजंग शिंदे यांनी शेवटी सांगीतले.
















