१३.५६ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर, १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द
मुंबई : प्रतिनिधी
राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचा-यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला. या भाडेवाढीमुळे या पूर्वी केलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होणार आहे.
एस. टी. महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणा-या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक ठरला आहे. ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचा-यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग आणि टायर यांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य ठरली. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाकडून गर्दीच्या हंगामात १० टक्के प्रवास भाडे वाढ करण्यात आली होती. ती प्रवासी भाडेवाढ १५ जुलैपर्यंत होती. मात्र, ती मुदत संपताच साध्या बसेसवरील १० टक्के भाडेवाढ ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय नव्याने भाडेवाढ करण्यात आल्याने रद्द करण्यात आला.
प्रवाशांना भुर्दंड
एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना अधिक प्रवास खर्चासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महागाईचा सामना करणा-या प्रवाशांना दरवाढीची झळ पोहोचणार आहे. आधीच महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच आता प्रवासभाडे वाढविल्याने प्रवाशांना अधिक आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
एस. टी.वर दाखविलेला
विश्वास कायम ठेवावा
राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, ही अपेक्षा आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
















