कर्मचा-यांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज खंगाळले
लातूर : प्रतिनिधी
शहरातील एम. जे. हॉस्पिटलचे संचालक, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली होती. या घटनेमुळे नातेवाईक व वैद्यकीय क्षेत्रातील मित्र परिवार दु:खात आहे. डॉ. मेहुल राठोड यांच्या आत्महत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस शनिवारी नातेवाईकांची भेट घेऊन जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच बरोबर पोलिस पथके तयार करून विविध अँगलने तपास सुरु केला आहे.
डॉ. मेहुल राठोड यांनी आत्महत्या का केली. त्या कारणांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी एम. जे. हॉस्पिटलच्या कर्मचा-यांची शुक्रवारी चौकशी करून घटनेचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही खंगाळले जात आहेत. गेल्या २ दिवसांत अंत्यविधी व शोकसभा असल्याने नातेवाईकांचे विशेषत: डॉ. मेहुल राठोड यांची आई व पत्नीचे जबाब नोंदवता आले नाहीत. त्यामुळे शनिवारी त्यांच्याशी भेटून या प्रकरणी जबाब नोंदवले जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. डॉ. मेहुल राठोड यांच्या आत्महत्येच्या घटनेने लातूरमधील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. मात्र, अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण पुढे आलेले नाही. त्यामुळे पोलिस विविध अँगलने तपास करीत आहेत. यामध्ये कुटुंबीयांचा जबाब महत्त्वाचा मानला जात आहे.
















